एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे एसीबीची कारवाई, पावणे दोन लाखांच्या रोकडसह व्हिस्कीची बाटली जप्त
जळगाव प्रतिनिधी : वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नरेश भास्कर शिरुडे (वय ४१, तलाठी, सजा उत्राण अहिर गढी, ता. एरंडोल), शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी, सजा उत्राण गुजर गढी, ता. एरंडोल) यांच्यावर कारवाई झाली आहे. तक्रारदार यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर दि. २७ जानेवारी रोजी सकाळी उत्राण गिरणा नदीपात्रात तलाठी नरेश शिरुडे यांनी पकडले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांनी ते ट्रॅक्टर सोडून दिले. मात्र, हे ट्रॅक्टर सोडल्याच्या बदल्यात आणि कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी शिरुडे यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, शिरुडे यांनी “मी इतरांकडून जास्त पैसे घेतो, पण तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून फक्त ३० हजार रुपये घेतो” असे म्हणत लाचेची रक्कम वाढवून मागितली. तसेच दुसरे तलाठी शिवाजी घोलप यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचला. एरंडोल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरील एका खोलीत शिवाजी घोलप यांनी नरेश शिरुडे यांच्या उपस्थितीत ३०,००० रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम १,७३,३०० रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच २,९५० रुपये किमतीची ‘पॉल जॉन’ कंपनीची ७५० मिली व्हिस्की बाटली (गिफ्ट रॅपरमध्ये पॅक केलेली) आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोनदेखील जप्त झाला आहे.
या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.









