संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी – शहरात पैशांच्या वादातून एका मजुरावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या बसस्थानकामागच्या तारसारंग वाईन शॉपजवळ ही घटना घडली असून, याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिरजू भिमा शिरसाठ (वय ३६, रा. दीक्षितवाडी) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २४ जानेवारी रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास ते जुन्या बसस्थानकाजवळील रस्त्यावरून जात असताना, संशयित आरोपी राजेश उर्फ गोलू भदाणे (रा. रथ चौक, जळगाव) याने त्यांच्याकडे २०० रुपयांची मागणी केली.
बिरजू शिरसाठ यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने गोलू भदाणे याने स्वतःजवळ असलेल्या ‘चॉपर’ने बिरजू यांच्यावर वार केले. या हल्ल्यात बिरजू शिरसाठ हे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पीडित बिरजू शिरसाठ यांनी २५ जानेवारी रोजी दुपारी ३:१६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रवीण वाघ तपास करीत आहेत.









