जळगावात नूतन मराठा कॉलेजच्या पार्किंगमधील थरार
जळगाव प्रतिनिधी – शहरांमधील नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये एका तरुणाकडे सिगारेट ओढण्यासाठी २० रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या ५ ते ६ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना फायटर, कडे आणि चावीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुणाल विजय खाचणे (वय १७, रा. धामणगाव) हा २४ जानेवारी रोजी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास आपल्या मित्रासह नूतन मराठा कॉलेजच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी करत होता. यावेळी आरोपी आकाश आणि त्याच्यासोबत असलेल्या ४ ते ५ मित्रांनी कुणालचा मित्र अक्षय याच्याकडे सिगारेटसाठी २० रुपयांची मागणी केली. अक्षयने पैसे देण्यास नकार दिला, ज्याचा राग आल्याने या संशयित आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पैसे नाकारल्याच्या रागातून संशयित आरोपी आकाशने त्याच्या हातातील चावीने अक्षयला मारहाण केली. त्याचवेळी चेतन हटकर याने कुणालच्या चेहऱ्यावर फायटरने गंभीर वार केले, तर गणेश हटकूर याने हातातील ‘कड्याने’ मारहाण केली. इतर दोन साथीदारांनीही दोन्ही तरुणांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.
याप्रकरणी कुणाल खाचणे याने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आकाश (पूर्ण नाव माहिती नाही), गणेश हटकर, चेतन हटकर आणि इतर दोन अनोळखी मित्र यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









