जळगावच्या ‘बहिणाबाई महोत्सवात’ मान्यवरांचा गौरव
जळगाव प्रतिनिधी : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘बहिणाबाई महोत्सवा’च्या संध्याकाळच्या सत्रात उत्साहात विविध मान्यवरांना ‘बहिणाबाई गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित होते. यावेळी देशभक्त सत्यनारायण बाबा मौर्य यांनी प्रखर विचार मांडून नागरिकांमधील देशभक्ती जागृत केली.

समाजसेवेच्या आणि आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यावेळेला नंदलाल गादीया, राजेंद्र देशमुख, किशोर ढाके, सरिता खाचणे, भारती काळे, वसंत पाटील, डॉ. निलेश चांडक आणि किरण बच्छाव यांना बहिणाबाई गौरव पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, निर्णय चौधरी, गोसेवक अजय ललवाणी, अनिल कांकरिया आणि रवींद्र लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महोत्सवाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी खुमासदार शैलीत केले.
सत्यनारायण बाबा मौर्य यांचे प्रबोधन
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण देशभक्त सत्यनारायण बाबा मौर्य यांचे संबोधन राहिले. त्यांनी आपल्या प्रखर विचारांनी आणि देशभक्तीपर गीतांनी नागरिकांमध्ये नवा उत्साह भरला. भारतीय परंपरा आणि संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे. आरोग्य आणि जीवनशैली चांगली हवी. पूर्वीच्या काळातील उत्तम आरोग्याचा दाखला देत त्यांनी सकस आहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. “लहानपण दे गा देवा” या भावनेतून त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
गंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करत, पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. सीमेवरील सैनिक आणि महापुरुषांच्या विचारांप्रती प्रत्येकाने कृतज्ञ राहिले पाहिजे, असे त्यांनी निक्षून सांगितले. गोवंश जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी उपस्थितांना काही मोलाच्या टिप्सही दिल्या. भरारी फाउंडेशनच्या या उपक्रमाला जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रतिसाद दिला.








