भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे अपेक्षा
जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता शहराच्या प्रथम नागरिकपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, महापौर निवडताना कोणताही कलंक नसलेला, सुसंस्कृत आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या चेहऱ्यालाच संधी द्यावी, असा सूर आता जळगावकरांमधून उमटत आहे.

जळगाव शहरात ज्यावेळी भाजपची परिस्थिती बिकट होती, त्या काळापासून पक्षाची शाखा वाढवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी घाम गाळला आहे, त्यांना यावेळेस संधी मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकजुटीने राहून, प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभागी होऊनही अद्याप कोणत्याही पदाची संधी न मिळालेल्या नगरसेवकाचा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा, असे मत व्यक्त केले जात आहे.
काही नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून प्रभागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे किंवा दमदाटी करून आर्थिक हितसंबंध जपण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये आहेत. “अशा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या हातात शहराची धुरा दिल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल. त्यामुळे हफ्तेखोरी आणि भ्रष्टाचाराचा डाग लागेल”अशा प्रतिक्रिया पक्ष वर्तुळातून उमटत आहेत.
जळगाव शहराचा विकास आराखडा राबवण्यासाठी आणि प्रशासनावर पकड मिळवण्यासाठी भाजपने यावेळेस एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिला नगरसेविकेला महापौरपदी संधी द्यावी. ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे आणि जे शहराच्या प्रश्नांची जाण ठेवतात, अशा व्यक्तीला महापौर बनवल्यास भाजपचा ‘१००% जागा जिंकण्याचा’ संकल्प येत्या काळात अधिक भक्कम होईल. सध्या दावेदार मानल्या जाणाऱ्या महिला नगरसेवकांमधील इच्छुकांनी जळगाव लोकसभा आणि जळगाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम इमानेईतबारे करून पक्षाकडे एक गठ्ठा मतदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून महिला महापौरपदी असणाऱ्या व्यक्तीकडून माफक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहे. अशा उमेदवारावर कोणताही भ्रष्टाचाराचा किंवा गुन्हेगारीचा आरोप नसावा. आंदोलने आणि पक्ष कार्यात सतत सक्रिय असलेल्यांना प्राधान्य मिळावे. शहराच्या प्रतिमेला साजेसा सुसंस्कृत महापौर मिळावा, अशा भावना व्यक्त झाल्या आहेत. आता पक्षश्रेष्ठी या जनभावनेचा आदर करून कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.









