जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची बाब समोर आली असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ चे मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेचा हा यथोचित गौरव मानला जात आहे.

श्री. संजय शेलार यांची कारकीर्द पोलीस दलातील शिस्त आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी पोलीस दलात ३५ वर्षे सेवा पूर्ण केली आहे. या ३५ वर्षांच्या काळात त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल तब्बल २४२ बक्षीसे मिळाली आहेत. संपूर्ण सेवा काळात त्यांना एकही शिक्षा, दंड किंवा ताकीद देण्यात आलेली नाही.
विशेष कौतुकाची बाब म्हणजे, ३५ वर्षांच्या सेवेत ते कधीही आजारी रजेवर गेलेले नाहीत. आरोग्याप्रति जागरूकता आणि कामावरील निष्ठा यातून स्पष्ट दिसून येते. त्यांच्या या अत्यंत शिस्तप्रिय आणि, उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









