यावल तालुक्यातील धक्कादायक प्रकार
यावल (प्रतिनिधी): लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याला तब्बल २ लाख ५४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार यावल तालुक्यातील मालोद येथे समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दिनेश शालीक पाटील (वय ३५, रा. मालोद, ता. यावल) यांचा विवाह जमवून देण्याच्या बहाण्याने काही मध्यस्थांनी व मुलीच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. २ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान हा लग्नाचा बनाव रचण्यात आला.
आरोपींनी संगनमत करून दिनेश यांचा विवाह जमवण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम २ लाख ३० लाख रुपये, इतर खर्च २४ हजार रुपये असा एकूण २,५४,००० रुपयांचा ऐवज उकळला. मात्र, लग्नाचा बनाव करून आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच दिनेश पाटील यांनी पोलिसात धाव घेतली.
फिर्यादीनुसार पोलिसांनी खालील ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पूनम सुलेश भिल्ल (रा. अडावद, ता. चोपडा), दिव्या लक्ष्मण पवार (खरे नाव: कृतिका जावरे, रा. बादसर, ता. भडगाव), मनोहर युवराज अहिरे (रा. अमरादे, ता. शिंदखेडा – मुलीचा काका), बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील (रा. अजंदे, ता. शिरपूर – मुलीचा मानलेला भाऊ), मुलीची आई (नाव माहीत नाही), मुलीची आत्या (नाव माहीत नाही), मुलीची आजी (नाव माहीत नाही)
यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करत आहेत. सध्या कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. लग्नाचे प्रस्ताव ठरवताना मध्यस्थ आणि मुलीकडील व्यक्तींची पूर्ण चौकशी केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.









