निलंबितांचा आकडा १९ वर; शिक्षणासह आरोग्य विभागात खळबळ
जळगाव प्रतिनिधी – बोगसगिरी करून किंवा दिव्यांगत्वाच्या निकषात बसत नसतानाही सवलती लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणी मोहिमेत टक्केवारीत मोठी तफावत आढळून आल्याने जळगाव जिल्हा परिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आज, २३ जानेवारी रोजी तडकाफडकी निलंबित केले. या धडक कारवाईमुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १९ वर पोहोचली असून जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार, सध्या राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी आणि व्यक्तींच्या ‘युडीआयडी’ कार्डची सखोल तपासणी सुरू आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता, अनेक कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत आणि प्रत्यक्ष स्थितीत मोठी तफावत असल्याचे समोर आले. याच कारणास्तव प्रशासनाने कठोर पाऊल उचलत निलंबनाचा बडगा उगारला आहे.
यापूर्वी १३ कर्मचाऱ्यांवर अशीच कारवाई झाली होती. आजच्या ६ जणांच्या निलंबनामुळे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘क्लीन अप’ मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आज निलंबित झालेले ‘ते’ सहा कर्मचारी
१. राजेश विजय खैरनार (आरोग्य सहाय्यक, ता. आरोग्य अधिकारी कार्यालय, रावेर)
२. प्रदीप बगडू ढाके (आरोग्य सहाय्यक, प्रा. आ. केंद्र सोनवद, ता. धरणगाव)
३. अजय पुंडलिक शिरसाठ (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा आव्हाने)
४. ज्ञानेश्वर वेडू चौधरी (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा सुनोदा)
५. स्वप्नाली वाल्मिक पाटील (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा पथराड, ता. धरणगाव)
६. पंकजा मगनलाल वाघ (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा नगाव, ता. पारोळा)
“दिव्यांगत्वाच्या नावाखाली चुकीचे लाभ घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तपासणी मोहीम सुरूच राहणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
— मीनल करणवाल, सीईओ, जिल्हा परिषद जळगाव









