आ. राजूमामा भोळे यांचे आवाहन, जळगावात बहिणाबाई महोत्सवाला थाटात प्रारंभ
जळगाव प्रतिनिधी – बहिणाबाई महोत्सवात खानदेशी संस्कृती, कला आणि संस्कारांचे दर्शन घडणार आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा आग्रह प्रत्येकाने धरला पाहिजे असे प्रतिपादन शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांनी केले.


शहरात भरारी फाउंडेशन व क्रेडाई संस्थेतर्फे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पद्मश्री चैत्राम पवार, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, माजी आ. मनीष जैन, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रजनीकांत कोठारी, निळकंठ गायकवाड, अनिस शाह, पुखराज पगारिया, संगीता पाटील मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगतातून बहिणाबाई महोत्सवाबद्दल कौतुक करून नागरिकांनी अधिकाधिक संख्येने भेट द्यावी असे आवाहन केले. या वेळेला उद्योजक पुखराज पगारिया आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत निळकंठ गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच मानसी गगडाणी यांना बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार राजूमामा भोळे यांनी जळगावच्या बहिणाबाई महोत्सवामध्ये केलेले भाषण अतिशय प्रेरणादायी आणि खानदेशी संस्कृतीचा गौरव करणारे ठरले. महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. बचत गटातील महिलांनी लावलेल्या स्टॉल्सचे कौतुक करून, त्यांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.शालेय विद्यार्थ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला असून राष्ट्रभक्तीपर गीते, खान्देशी गाणी आणि पोवाडे यांचा आस्वाद घेता येणार आहे.

खान्देशी खाद्यसंस्कृती (उदा. कचोरी, ओले बिबडे) आणि सुगरण भगिनींनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी जळगावकरांना केले. पंतप्रधानांचा संदेश आणि विकसित भारताचा संकल्प करून ‘एक पेड माँ के नाम’ लावायचे. पर्यावरणासाठी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून ते जगवावे. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा आग्रह त्यांनी धरला.

जळगावकरांनी महापालिकेत महायुतीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि सेवेची संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले. पद्मश्री चैत्राम पवार यांनी नागरिकांना सुखी व संपन्न जीवनाचा मूलमंत्र देऊन आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे असे सांगितले. जंगल, जल, जमीन, पर्यावरण या सर्वांचा समतोल राखून निसर्ग समृद्ध केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून खा. स्मिता वाघ यांनी बहिणाबाई महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. प्रस्तावना बहिणाबाई महोत्सवाचे संचालक तथा भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी यांनी केले.









