जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील एम.आई.डी.सी. परिसरातून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने भिंतीला छिद्र पाडून मायलेकीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आई.डी.सी. पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३८ वर्षीय फिर्यादी महिला आपल्या मुलीसह जळगाव शहरातील एका बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या घराच्या शेजारील खोलीत पुरुषोत्तम निवृत्ती कुटे (रा. केशव नगर, ता. रिसोड, जि. वाशिम) हा राहत होता. आरोपी पुरुषोत्तम याने फिर्यादीच्या घराच्या सिमेंटच्या पत्र्याला चार छिद्रे पाडली होती. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास, फिर्यादी महिला आणि त्यांची मुलगी अंघोळ करत असताना, आरोपीने त्या छिद्रांमधून आपल्या मोबाईलद्वारे त्यांचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड केले. या प्रकारामुळे महिलेच्या आणि मुलीच्या लज्जेचा भंग झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पिडीत महिलेने २२ जानेवारी २०२६ रोजी एम.आई.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी पुरुषोत्तम कुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे: या प्रकरणाचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या करत आहेत. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.









