भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भडगाव (प्रतिनिधी): मालेगाव-जामनेर बसने प्रवास करणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुमन उत्तम मालपुरे (वय ७०, रा. लोहटार, ता. पाचोरा, ह.मु. पुणे) या २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.४५ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान मालेगाव ते जामनेर या बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली ५०,००० रुपये किमतीची सोन्याची मणी असलेली पोत आणि ५,००० रुपये किमतीचा एम.आय. कंपनीचा मोबाईल, असा एकूण ५५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
आपला ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात येताच सुमन मालपुरे यांनी भडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सहाय्यक फौजदार भरत दौलत लिंगायत तपास करीत आहे.









