जळगावात शिक्षण विभागात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी): बनावट नियुक्ती आदेश तयार करून आणि वरिष्ठ कार्यालयांची दिशाभूल करून एका शिक्षकाची बेकायदेशीर नियुक्ती मिळवून शासनाचे लाखो रुपयांचे वेतन लाटल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजुमन-ए-तालीमुन मुस्लिमीन संचलित मौलाना अब्दुल रज्जाक अँग्लो उर्दू हायस्कूल (प्रताप नगर, जळगाव) येथे ही घटना घडली. तक्रारदार डॉ. अ. करीम अ. मजीद सालार (वय ७२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जुलै २०१८ पासून ते आजपर्यंत संशयित आरोपींनी संगनमताने हा कट रचला.संस्थेचे उपाध्यक्ष आणि शाळा समिती सदस्य असलेले सैय्यद चाँद सैय्यद अमीर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, संस्थेच्या नियमावलीचे उल्लंघन केले. त्यांनी इतर आरोपींच्या मदतीने आपला मुलगा सैय्यद अमरुल्ला सैय्यद चाँद कासार याला विनाअनुदानित तत्त्वावर उपशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव प्रलंबित असतानाच, आरोपींनी बनावट नियुक्ती आदेश तयार केले.
बनावट आदेशाच्या आधारे संशयित आरोपींनी शालार्थ आयडी मिळवला आणि शिक्षण उपसंचालक नाशिक तसेच उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांची दिशाभूल केली. याद्वारे त्यांनी शासनाकडून थकबाकीचे ६,२३,९७० रुपये आणि नियुक्तीपासून आजपर्यंतचे नियमित वेतन मिळवून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. सैय्यद अमरुल्ला सैय्यद चाँद कासार (उपशिक्षक), सैय्यद चाँद सैय्यद अमीर (उपाध्यक्ष), शेख नईमोद्दीन शेख अफजलोद्दीन (तत्कालीन निवृत्त मुख्याध्यापक), राजेंद्र रघुनाथ चौधरी (वरिष्ठ सहाय्यक, जि.प. जळगाव), शेख जहीर शेख सलाउद्दीन (उपशिक्षक, भडगाव उर्दू शाळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सुरेश आव्हाड करीत आहे. या मोठ्या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि शिक्षण विभागातील इतर कोणाचे यात हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









