एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव प्रतिनिधी – शहरातील अजिंठा चौफुली भागातील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरबाहेरून दुचाकीच्या बॅटरी आणि असेंबली चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

११ जानेवारीच्या रात्री ७ वाजेपासून ते १२ जानेवारीच्या सकाळी ९.३० वाजेदरम्यान अजिंठा चौफुलीवरील ओला सर्व्हिस सेंटरच्या समोरील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी आणि ‘MCU’ असेंबली चोरून नेली होती. याप्रकरणी २० जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाची स्थापना केली. पथकाने घटनास्थळासह शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी अब्देअली शब्बीर नगरी (वय २८, रा. शिवाजीनगर, जळगाव), साकीब खान इरफान खान सिकलगर (वय २२, रा. सालारनगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
तपास पथकाने या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेला ५७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गिरीश पाटील आणि निलेश पाटील करत आहेत.









