नाशिकला विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी पूर्ण, कारागृहातील ललित कोल्हेंची नोंदणी होणार शुक्रवारी
जळगाव (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना पक्षाचे २२ व अपक्ष १ अशा एकूण २३ नगरसेवकांचा गट गुरुवारी २२ रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला. या गटाची नोंदणी करण्यापूर्वी बुधवारी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नव्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी विष्णू भंगाळे, उपगटनेतेपदी प्रतिभा देशमुख तर प्रतोदपदी ॲड. दिलीप पोकळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

तर ललित कोल्हे हे कारागृहात असल्याने त्यांची नोंदणी होऊ शकली नसून शुक्रवारी नोंदणीसाठी त्यांना परवानगी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. विष्णू भंगाळे हे पाचव्यांदा विजयी झाले असून त्यांचा अनुभव आणि नेतृत्वगुण लक्षात घेऊन त्यांना पुन्हा गटनेतेपदी निवडण्यात आले आहे. प्रतिभा देशमुख या तिसऱ्यांदा विजयी झालेल्या नगरसेविका असून त्यांना उपगटनेतेपदी जबाबदारी देण्यात आली आहे. तर ॲड. दिलीप पोकळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले असून त्यांना प्रतोदपदी निवडण्यात आले आहे.
या तिन्ही पदांवर झालेली निवड एकमताने करण्यात आली. गुरुवारी सकाळी सर्व विजयी नगरसेवक नाशिक येथे दाखल झाले आणि गटाची नोंदणी पूर्ण केली. या प्रक्रियेद्वारे शिवसेना पक्षाचा अधिकृत गट महापालिकेत स्थापन झाला आहे. बनावट कॉल सेंटरच्या प्रकरणी ललित कोल्हे हे कारागृहात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत कोल्हे यांनी निवडणूक लढवून शिवसेना पक्षाकडून ते विजयी झाले. शिवसेनेची २२ नगरसेवक, १ अपक्ष यांची गटनोंदणी गुरूवारी झाली आहे. न्यायालयाकडून कोल्हे यांना गटनोंदणीसाठी परवानगी असून ते शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे शिवसेना गटातील सदस्यांमध्ये नोंद करतील अशी माहिती शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी माहिती दिली.









