जळगाव (प्रतिनिधी):- महावितरणने ग्राहकांसाठी वीज विषयक सर्व सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या डिजिटल सेवांचा वापर वाढावा, यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले आहे. चालू आर्थिक वर्षात महावितरणच्या जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांनी डिजिटल पर्याय अवलंबून व तत्पर वीजबिल भरणा करून जवळपास 6 कोटी रुपयांची सवलत प्राप्त केली आहे.

महावितरणकडून ग्राहकांनी सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रक्कमेच्या (कर व शुल्क वगळून) जवळपास 1 टक्का तत्पर बिल भरणा सवलत, डिजिटल पद्धतीने ऑनलाईन (नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट/कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट/यूपीआय इ. वापरून) वीजबिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून) 0.25 टक्के डिजिटल बिल भरणा सवलत व गो ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारून छापील बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल घेतल्यास दरमहा 10 रुपये सवलत दिली जाते.
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांनी चालू आर्थिक वर्षात तत्पर वीजबिल भरणा सवलत 4 कोटी 54 लाख 63 हजार, डिजिटल बिल भरणा सवलत 1 कोटी 16 लाख 97 हजार व गो ग्रीन पर्याय निवडण्याची सवलत 25 लाख 33 हजार अशी एकूण 5 कोटी 96 लाख 93 हजार रुपयांची सवलत मिळवली आहे. त्यात जळगाव मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे 2 कोटी 88 लाख 12 हजार, 71 लाख 35 हजार व 16 लाख 26 हजार असे एकूण 3 कोटी 75 लाख 73 हजार सवलत मिळवली आहे. धुळे मंडळातील ग्राहकांनी अनुक्रमे 1 कोटी 21 लाख 25 हजार, 31 लाख 81 हजार व 5 लाख 70 हजार सवलत मिळवली आहे, तर नंदुरबार मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे 45 लाख 26 हजार, 13 लाख 80 हजार व 3 लाख 37 हजार सवलत मिळवली आहे.
महावितरणने ग्राहकांना वीज बिल पाहणे व भरणे, तक्रार नोंदवणे, नवीन वीजजोडणी अर्ज, वीजभार व नाव बदलणे इ. सर्व सेवा महावितरण वेबसाईट, महावितरण ग्राहक मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून सुरक्षित, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सेवांचा लाभ घेऊन नियमित व वेळेत ऑनलाईन वीजबिल भरावे तसेच वीजबिलांसाठी गो ग्रीन पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.









