जळगावमध्ये बंद घर फोडले
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्योधन बाबुराव साळुंखे (वय ५६, रा.विठ्ठलवाडी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही चोरी २० रोजी रात्री 2 ते 4 वाजेदरम्यान झाली. फिर्यादीचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील देव्हाऱ्यातील आणि कपाटातील मौल्यवान वस्तूंची चोरी केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.









