जळगावात जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्याच्या रागातून, एका नवनिर्वाचित नगरसेवकाला भररस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत “तुझ्या रक्ताची होळी करू” अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विष्णू रामदास भंगाळे (वय ५५, रा. ओंकार नगर, जळगाव) हे १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:०५ वाजेच्या सुमारास भंगाळे हे त्यांचे सहकारी वसंत सोनवणे आणि सागर पाटील यांच्यासह घराशेजारील प्लॉटजवळ उभे होते. त्यावेळी संशयित आरोपी प्रशांत चौधरी आणि त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम मोटारसायकलवरून तिथे आले. “आमचा उमेदवार निवडणुकीत पडला” या कारणावरून संशयितांनी भंगाळे यांना उद्देशून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता, “तुला बघून घेतो, तुझ्या रक्ताची होळी करू” अशी धमकी देऊन संशयित तिथून पसार झाले.
या प्रकारानंतर विष्णू भंगाळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत चौधरी व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक राजेश पदमर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर शहरात राजकीय वाद उफाळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.









