जळगावात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ (नयनतारा अँड सन्स) शोरूममध्ये सोन्याची साखळी (चेन) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० ते ५:२५ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी गणेश राजाराम कोळे (वय ४९, रा. अयोध्या नगर, जळगाव), जे या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री यासंदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे. सुमारे २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
फिर्यादीनुसार, कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, फिर्यादीच्या संमतीशिवाय ही सोन्याची चेन लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी एम. कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम बोरसे करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









