मेहुणबारे पोलिसांची मोठी कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी): मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दरेगाव आणि वरखेड येथून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकलचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला मालेगाव येथून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

दि. ८ जानेवारी रोजी दरेगाव आणि वरखेड परिसरातून भरदिवसा दोन मोटारसायकल चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि प्रविण दातरे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते.
तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी दादू संजय सोनवणे (वय १९, रा. दरेगाव, ता. मालेगाव) याला मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील एक आणि इतर एक अशा एकूण दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. पकडण्यात आलेला आरोपी हा सराईत दुचाकी चोर असून, त्याचे इतर दोन साथीदार सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून, त्यांच्या अटकेनंतर आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सपोनि प्रविण दातरे, पोउपनि सुहास आव्हाड, पोउपनि विकास शिरोळे, पोहेकाँ मोहन सोनवणे, गोकुळ सोनवणे, पोना मिलिंद कुमावत, पोकाँ विनोद बेलदार, राकेश काळे आणि प्रशांत खैरे यांच्या पथकाने केली. या घटनेचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.









