बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी ‘कोम्बिंग’ राबवत मुस्लीम कॉलनी परिसरातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसांसह अटक केली. संशयीत शहरात दहशत निर्माण करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा संशयीतांचा कट पोलिसांनी उधळला तर सुमारे १५ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतले. या दुचाकींच्या कागदपत्रांबाबत तपासणी केल्यानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

मध्यप्रदेशातील (बडोदा, जि.आगरमालवा) येथील पोलिस हे संशयित करार अली हुजूर अली याला अटक करण्यासाठी आल्यानंतर १५ जानेवारी रोजी रात्री बाजारपेठ पोलिसांची मदत घेण्यात आली. मात्र संशयीताच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांचा रस्ता अडवला. संशयीताला नेऊ देणार नाही, असे म्हणत जमावाने पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करीत विटा व लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला होता. या गुन्ह्यातील संशयीतांना अटक करण्यासाठी भुसावळात कोम्बिंग राबवण्यात आले.
अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ व गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकार्यांनी कोम्बिंग करीत रेकॉर्डवरील गुन्हेगार मजहर अब्बास जाफर ईराणी (१९, रा.पापानगर, भुसावळ) यास अटक केली. तत्पूर्वी पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव आणि पथकाने तातडीने मुस्लीम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयीत मजहर ईराणी हा संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसताच, पथकाने झडप घालून त्याला जागीच पकडले.
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या कमरेला आणि पॅन्टच्या खिशात १५ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल (मॅगझीनसह) आणि दोन हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे आढळले. पोलिस महेंद्रसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत मजहर अब्बास जाफर ईराणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोम्बिंगची ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेडेड उपनिरीक्षक रवी नवाडे, हवालदार गोपाल गावडे, उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच बाजारपेठ पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, प्रशांत सोनार, योगेश माळी, सीमा चिखलकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत परदेशी यांनी केली.









