जळगाव शहरात मेहरूण तलाव येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात मेहरूण तलावाजवळील पुलावर एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विजय सुकलाल जोशी (वय ६५, रा. शिवबानगर, कोल्हे हिल्स, जळगाव) हे १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास मेहरूण तलावाजवळील पुलावरून जात होते. यावेळी संशयित आरोपी अनंत प्रमोद गोंडे आणि अनिल शंकर लागवणकर (दोन्ही राहणार जोशी कॉलनी, जळगाव) हे कोणत्याही कारणाशिवाय शिवीगाळ करत होते. जोशी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, दोघांना त्याचा राग आला. संतापलेल्या आरोपींनी आपल्याजवळील चाकूने जोशी यांच्या पोटावर डाव्या आणि उजव्या बाजूला वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
या घटनेनंतर विजय जोशी यांनी १७ जानेवारी रोजी रात्री एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करत आहेत.









