जामनेर तालुक्यात पाळधी शिवारात घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा संच (सोलर) आणि विहिरीतील तांब्याच्या केबलवर डल्ला मारला आहे. या घटनेत सुमारे ४१,४०० रुपयांचा माल चोरीला गेला असून, पहूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळधी शिवारातील शेत गट क्र. ८६४, ८५६, ८९२/१, ८६३, ८९१/८९३ आणि ८६८/१ अ या भागातील शेतात ही चोरी झाली. दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपासून ते १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी ही संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी प्रभाकर दामू शिंपी आणि इतर शेतकऱ्यांच्या मालकीची सोलर यंत्रणा आणि विहिरीतील महागड्या तांब्याच्या केबल चोरून नेल्या.
फिर्यादी प्रभाकर दामू शिंपी (वय ६३, रा. पाळधी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत ४१,४०० रुपये किमतीचा माल लंपास केला आहे. सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची तक्रार १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५:२५ वाजता पहूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील हे करत आहेत.









