बेंडाळे, बरडे, खडके, घुगे, काळे, हाडा स्पर्धेत : मनोज चौधरींसह सोनवणे, पोकळे, कोल्हे यांची नावे चर्चेत
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपकडे महापौर तर दुसरा मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गट यांच्याकडे उपमहापौर पद जाणार आहे. यात जुने तरुण व निष्ठावंत चेहऱ्यांचे नावे आता स्पर्धेमध्ये आहे. निवड करताना नेत्यांचा कस लागणार आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेत कमळ चिन्हावर निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ उमेदवार विजयी झाले. तर धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचे २३ पैकी २२ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव प्रफुल्ल देवकर हे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक १ मधील अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणे हे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे बलाबल ७५ पैकी ७० असे होत आहे.
निवडणूक झाल्यानंतर आता महापालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवड आहे. यामध्ये भाजप, शिवसेना दोन्ही पक्षांकडून ज्यांना आतापर्यंत महापौर व उपमहापौर पदाची संधी मिळालेली नाही, अशी जुने निष्ठावंत व तरुण चेहऱ्यांची नावे शर्यतीमध्ये आहे. यात महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते याकडेही लक्ष लागून आहे. मात्र भाजपकडे आता महापौर पदासाठी नावे तयार असल्याची माहिती मिळाली आहे.
जळगाव महापालिकामध्ये डॉ. विश्वनाथ खडके हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तर भाजपचे निष्ठावंत उज्ज्वला बेंडाळे, शुचिता हाडा, दीपमाला काळे, नितीन बरडे, सुनील वामनराव खडके हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यांच्यासह राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव महापौरपदासाठी भाजपच्या यादीत सर्वात वरती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर दुसऱ्या पक्षातून आलेले नेतेमंडळी असलेले नितीन लढ्ढा, सुनील महाजन, जयश्री महाजन यांना संघटनात्मक दुसरी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे शिवसेनेमध्ये चौथ्यांदा नगरसेवकपदी निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी हे उपमहापौरपदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत. त्यांच्यानंतर ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीण रामदास कोल्हे, दिलीप बबनराव पोकळे, गणेश उर्फ विक्रम किसन सोनवणे, सिंधुताई कोल्हे यांचीही नावे उपमहापौर पदासाठी सर्वात वरती आहेत. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे हे गटनेतेपदी राहतील अशी माहिती शिवसेनेच्या गोटातून प्राप्त झाली आहे.









