जळगाव महापालिका निकाल: महायुतीचे वर्चस्व; दिग्गजांनी राखली आघाडी!


माजी महापौर ललित कोल्हे, नितीन लढ्ढा आणि विष्णू भंगाळे विजयाच्या पथावर; कार्यकर्त्यांत जल्लोष
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून, आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) जोरदार मुसंडी मारली आहे. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने आघाडीवर असून, ‘सत्तेचा सोपान’ कोण सर करणार याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.
प्रमुख प्रभागांमधील सद्यस्थिती:
माजी महापौरांचा दबदबा: प्रभाग क्रमांक ४ मधून पियुष ललित कोल्हे यांनी ८०० मतांची मोठी आघाडी घेतली आहे. प्रभाग ५ मधून माजी महापौर नितीन लढ्ढा ६५० मतांनी, तर विष्णू भंगाळे देखील आघाडीवर आहेत. प्रभाग ११ मध्ये माजी महापौर ललित कोल्हे २२८ मतांनी आघाडीवर आहेत.
प्रभाग १९ मध्ये महायुतीचे वर्चस्व: या प्रभागातून शिवसेनेच्या निकिता वंजारी आणि भाजपचे राजेंद्र घुगे पाटील यांनी विजयाकडे कूच केली आहे.
प्रभाग १३ व १४ मधील चुरस: प्रभाग १३ मधून भाजपच्या सुरेखा तायडे ५४८ मतांनी पुढे आहेत, तर याच प्रभागात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रफुल्ल देवकर ६७७ मतांनी आघाडीवर आहेत. प्रभाग १४ मध्ये जयश्री महाजन आणि सुनील महाजन यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
इतर आघाडीवरील उमेदवार: प्रभाग ९ मधून भाजपचे जयश्री राहुल पाटील आणि चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी आघाडी घेतली आहे. प्रभाग १२ मध्ये गायत्री राणे आणि नितीन बरडे आघाडीवर आहेत.
१२ जागांवर आधीच फैसला
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांपैकी १२ जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सागर सोनवणे, दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे, मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख, उज्ज्वला बेंडाळे, वैशाली पाटील, डॉ. विश्वनाथ खडके, डॉ. गौरव सोनवणे, रेखा पाटील आणि विक्रम सोनवणे यांचा समावेश आहे. उर्वरित ६३ जागांसाठी आज प्रत्यक्ष मतमोजणी होत आहे.
कुसुंबा परिसरात समर्थकांची गर्दी
कुसुंबा येथील वखार महामंडळाच्या केंद्रावर मतमोजणी सुरू असून, निकालाचे कल जसे समोर येत आहेत, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत आहे. केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. केंद्रात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे.








