जळगाव महापालिका निवडणूक : मागीलपेक्षा यंदा मतदानाचा टक्का घसरला
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना आणि जनजागृतीनंतरही मतदारांमध्ये यंदा पुन्हा एकदा निरुत्साह पाहायला मिळाला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला असून शहरात एकूण ५३.५९ टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या वर्षी ५५.७७ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा मतदारांनी मतदानाकडे काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


आज सकाळी ७:३० वाजता शहरातील विविध केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. दुपारपर्यंत मतदारांचा प्रतिसाद अत्यंत संथ होता, मात्र दुपारी ३:०० वाजेनंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. दुपारी ३:०० नंतर केंद्रांवर अचानक गर्दी वाढल्याने निवडणूक प्रशासनावर मोठा ताण पडला. मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात एकूण २,३४,९९६ मतदारांनी आपला हक्क बजावला.
यामध्ये १,२२,८५८ पुरुष मतदार, १,१२,१३३ स्त्री मतदार आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानाची अधिकृत वेळ संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत असली, तरी दुपारी उशिरा सुरू झालेल्या गर्दीमुळे अनेक केंद्रांच्या गेटवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ५:३० वाजेपूर्वी जे मतदार केंद्राच्या आवारात दाखल झाले होते, त्या सर्वांना मतदान करू देण्यात आले.
यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया रात्री ६:३० ते ७ वाजेपर्यंत सुरू होती. सकाळपासून संथ गतीने चाललेल्या प्रक्रियेनंतर शेवटच्या दोन तासांत झालेल्या गर्दीमुळे कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मतदानाचा टक्का घटल्यामुळे आता राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








