पाचोरा शहरातील घटना ; गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी):- शहरातील कोडवाडा गल्ली परिसरात सायंकाळच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पोत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जबरी चोरीत सुमारे १ लाख ५७ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास झाला असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोडवाडा गल्लीतील रहिवासी वंदना नंदकिशोर कोतकर (वय ४८) या १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही कामासाठी घराबाहेर निघाल्या होत्या. त्या रस्त्यावरून जात असताना अचानक एका दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले. काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने वंदना यांच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जोरात हिसकावून घेतली.
वंदना यांनी आरडाओरड केली, मात्र अंधाराचा फायदा घेत भामटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. या घटनेमुळे धक्का बसलेल्या वंदना यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असून अज्ञात आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









