जळगाव महापालिका निवडणूक : बोगस मतदानाचा प्रयत्न हाणून पाडला; प्रभाग ५ ‘अ’ मधील निवडणुकीला गालबोट
चाळीसगावचा संशयित बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ ‘अ’ मधील मतदान प्रक्रियेला आज बोगस मतदानाच्या प्रयत्नामुळे गालबोट लागले. शहरातील आर. आर. विद्यालयातील मतदान केंद्रावर काही बोगस मतदार हे चाळीसगावातून येथे मतदानासाठी आल्याचा संशय आल्यावरून अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले . यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख माजी उपमहापौर विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीत हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळपासून आर. आर. विद्यालयात मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास काही मतदारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार दाखल करत ओळखपत्रांची तात्काळ पडताळणी करण्याची मागणी केली. तक्रार मिळताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत संबंधित ४० ते ४५ जणांची कसून चौकशी सुरू केली. अधिकृत ओळखपत्रे व वास्तव्याचे पुरावे सादर करण्यास हे संशयित अपयशी ठरल्यानंतर त्यांना मतदानापासून रोखत केंद्राबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या घटनेला राजकीय वळण देत ॲड. पियुष पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रभागात ३ हजारांहून अधिक बोगस व दुबार मतदार असल्याची तक्रार मी यापूर्वीच प्रशासनाकडे केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज बोगस मतदानाचा हा धाडसी प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, प्रतिष्ठेच्या या लढतीमुळे वातावरण अधिकच तापले आहे.
या प्रकारानंतर मतदान केंद्राबाहेर समर्थकांची मोठी गर्दी जमली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात केला, तर काही काळ तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. सध्या मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असली तरी, या बोगस मतदानाच्या प्रयत्नामुळे संपूर्ण जळगाव शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









