पालक आणि मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी): पारंपारिक खेळांचे महत्त्व कळावे आणि पालक-पाल्यांमधील नाते अधिक घट्ट व्हावे, या उद्देशाने ‘पालक शाळा’ तर्फे मकर संक्रांतीनिमित्त मेहरुण तलावाच्या काठावर अभिनव पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला मलार कम्युनिकेशनचे अनमोल सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला पालक शाळेचे संचालक रत्नाकर पाटील, डॉ. अनंत पाटील, समन्वयक कृणाल महाजन आणि आनंद मलारा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृणाल महाजन यांनी ‘पालक शाळा’ संकल्पनेची माहिती दिली, तर डॉ. अनंत पाटील यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागची सविस्तर भूमिका मांडली.
मेहरुण तलावाच्या परिसरात आयोजित या उत्सवात ६० ते ७० पालक आणि मुलांनी सहभाग नोंदवला. ५ ते १५ वयोगटातील मुलांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. निळ्या आकाशात उंच भरारी घेणाऱ्या रंगीबेरंगी पतंगी आणि पतंग कापल्यानंतर होणारा जल्लोष, यामुळे वातावरण अत्यंत आनंदी झाले होते. खेळाच्या माध्यमातून मुलांचे आणि पालकांचे बॉन्डिंग वाढावे, हा यामागचा मुख्य उद्देश यशस्वी झाल्याचे दिसून आले.
मकर संक्रांतीच्या आनंदासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखत, आयोजकांतर्फे सर्व पालकांना एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले. “मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरात लवकर आपला हक्क बजावावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पाटील, क्षितिजा देशपांडे, अश्विनी पटवर्धन, सचिन कोल्हे आदींनी विशेष परिश्रम घेतले.










