भडगाव-पिंपळडे रस्त्यावर भीषण अपघात
भडगाव (प्रतिनिधी): भडगाव-पिंपळडे रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकीने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागे बसलेला तरुण रस्त्यावर फेकला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात तरुणाच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास सागर रमेश जाधव (वय २८, रा. सिंदी, ता. भडगाव) हा तरुण दुचाकीवरून (क्रमांक एमएच ५४ डी ९२८३) जात होता. ही दुचाकी संशयित आरोपी तुषार मधुकर मते (रा. दहीवाळ, ता. मालेगाव) हा चालवत होता. पिंपळडे ते भडगाव रस्त्यादरम्यान, चालकाने आपली दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून अचानक जोरात ब्रेक मारला. गाडीचा वेग जास्त असल्याने आणि रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेतल्याने, मागे बसलेला सागर जाधव हा गाडीवरून उडून रस्त्याच्या बाजूला जोरात आदळला.
या अपघातात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सिंदी परिसरात शोककळा पसरली आहे. मयताचा नातेवाईक बबन भास्कर जाधव (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भडगाव पोलिसांनी दुचाकी चालक तुषार मते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ अनिल आहेर तपास करीत आहेत.









