जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १८ महिन्यांसाठी हद्दपार (तडीपार) केलेला गुन्हेगार शहरातच वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. अमन उर्फ खेकडा रशीद सय्यद असे या गुन्हेगाराचे नाव असून, एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘एच’ सेक्टरमध्ये, पुष्पा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारी दि. ११ जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता, पोलिसांना तडीपार असलेला अमन उर्फ खेकडा हा मिळून आला.
संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सय्यद (वय २४, रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी, जळगाव) याला पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातून दीड वर्षासाठी (१८ महिने) हद्दपार करण्यात आले होते. तडीपारीचा आदेश लागू असतानाही, कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तो शहरात वास्तव्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ (हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोहेकाँ संजीव मोरे तपास करीत आहे.









