धरणगाव तालुक्यात अहिरे गावाजवळील घटना
धरणगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील अहिरे गावाच्या शिवारात चिमणी विटभट्टीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक तरुणाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला १ जण जखमी झाला आहे.

एकनाथ दयाराम मराठे (वय २२, रा. बाभुळगाव, ता. धरणगाव) आणि त्याचा मित्र अमोल संजय सोनवणे (वय १९) हे दोघे सोमवारी (दि. १२ जानेवारी) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एम एच ०५डीडी २०७२) बाभुळगावहून बांभोरी प्र.चा. येथील एका कंपनीत कामावर जात होते. अहिरे गावाजवळून जात असताना त्यांच्या पुढे एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ४० आय १८२५) भरधाव वेगाने जात होता. एकनाथ मराठे याने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅक्टर चालकाने अचानक आपले वाहन उजव्या बाजूला वळवले. यामुळे दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील भागाला धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालक एकनाथ मराठे हा थेट ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील चाकाखाली फेकला गेला आणि चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अमोल सोनवणे हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी जखमी अमोल सोनवणे याने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोहेकॉ नितीन पाटील तपास करीत आहे. ऐन विशीत असलेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बाभुळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









