हिरापूरजवळ घटना, तळेगावहून गावाकडे येताना काळाचा घाला
चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील हिरापूर गावाजवळील नूरानी मशीद परिसरात सोमवारी रात्री मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर कंपनीच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत हिरापूर येथील ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे सागर संजय वराडे (वय २७ वर्षे), सोमनाथ संजय वराडे (वय ३२ वर्षे), अक्षय बापू पाटील (वय ३० वर्षे) हे तिघेही हिरापूर ता. चाळीसगाव येथील रहिवासी होते. यातील सागर आणि सोमनाथ हे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर येत असल्याने वराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी दि. १२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हे तिघे तरुण दुचाकीवरून तळेगावहून हिरापूरकडे येत होते. नूरानी मशीद जवळ समोरून येणाऱ्या आयशर कंपनीच्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. तिघेही तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, अपघातानंतर आयशर चालक वाहन सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. एकाच गावातील तीन होतकरू तरुणांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने हिरापूर गावातील प्रत्येक घरात शोक व्यक्त केला जात आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









