आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची माहिती
जळगाव विशेष प्रतिनिधी

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, उद्यापासून निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. गुरुवारी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, शोभा बाविस्कर आणि सहा निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
असे आहे महापालिका प्रशासनाचे नियोजन
मतदान केंद्रे: एकूण ५१६ केंद्रे.
विशेष केंद्रे: १ पिंक बूथ (महिला संचलित), २ दिव्यांग केंद्र आणि १२ आदर्श मतदान केंद्रे.
मनुष्यबळ: ३,५५५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ, ज्यात २०० महिला कर्मचारी आणि ५२ क्षेत्रीय अधिकारी आहेत.सुरक्षा: ५१६ पोलीस कर्मचारी तैनात. प्रशिक्षण: ७२ मास्टर ट्रेनरद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण. उद्या मंगळवारी एमआयडीसी येथील वखार महामंडळ १४ व १७ येथून निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येईल.
मतदान
१५ जानेवारी (गुरुवार): सकाळी ६:०० वाजता ‘मॉक पोल’ होईल. सकाळी ७:०० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. वेळ मर्यादा: सायंकाळी ५:३० वाजता मतदान बंद होईल. मात्र, साहित्याच्या वेळी जे मतदार रांगेत असतील, त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल. सुरक्षितता: मतदानानंतर सर्व यंत्रे सीलबंद करून वखार महामंडळातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतील.
मतमोजणी आणि निकाल १६ जानेवारी
शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी एकूण १४ टेबल लावण्यात आले आहेत. सर्वात आधी टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मोजणी सुरू होईल. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवारांना जागीच प्रमाणपत्र दिले जाईल. जे उमेदवार गैरहजर असतील, त्यांना महापालिकेतून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
असे असेल मतमोजणीचे विभागवार नियोजन
महानगरपालिका प्रशासनाने मतमोजणीसाठी ६ विभागांमध्ये विभागणी केली असून एकूण १४ टेबलवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या विभागात प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ ची मतमोजणी होणार असून प्रत्येकी ६ राऊंड होतील. दुसऱ्या विभागात प्रभाग क्रमांक ४ चे ६ राऊंड, तर प्रभाग ५ आणि ६ चे प्रत्येकी ७ राऊंड होतील. तिसऱ्या विभागात प्रभाग ७ चे ६ राऊंड, तर प्रभाग ११ आणि १२ चे प्रत्येकी ७ राऊंड नियोजित आहेत. चौथ्या विभागाच्या नियोजनानुसार प्रभाग १३ चे ७ राऊंड होतील, तर प्रभाग १४, १८ आणि १९ चे प्रत्येकी ५ राऊंड पार पडणार आहेत.
पाचव्या विभागात प्रभाग १५, १६ आणि १७ या तिन्ही प्रभागांचे प्रत्येकी ६ राऊंड संपन्न होतील. सहाव्या विभागात प्रभाग ८ चे ८ राऊंड, प्रभाग ९ चे ९ राऊंड आणि प्रभाग १० चे एकूण ७ राऊंड होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृत निकाल जाहीर करतील.









