सव्वा लाखाचा ऐवज लंपास
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हातगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जयाबाई गोकुळ आव्हाड (वय ३६, रा. हातगाव) या १० जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३.४५ च्या दरम्यान घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. एकूण किंमत १,१९,८०० रुपयेचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेनंतर ११ जानेवारी रोजी दुपारी ३.३७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









