राष्ट्रवादीच्या उमेदवार अलका सपकाळ (देशमुख) यांनी मांडले ‘व्हिजन’
जळगाव (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १९ ‘क’ मधील लढत अत्यंत चुरशीची ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचाराला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. “केसरीराज”शी संवाद साधताना त्यांनी प्रभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि भविष्यातील विकासकामांवर आपले परखड विचार मांडले.

प्रभागाचा कायापालट हाच ध्यास – अलका सपकाळ(देशमुख)
मुलाखती दरम्यान अलका सपकाळ (देशमुख) म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील रस्ते, गटारी आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. केवळ आश्वासनं देऊन मते मागण्यापेक्षा, प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवणे हे माझे उद्दिष्ट आहे. प्रभागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असो किंवा पिण्याच्या पाण्याचे नियोजन, प्रत्येक घरापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कंबर कसली आहे.”
नव्या दमाचे नेतृत्व : विशाल देशमुख यांचे सामाजिक व्हिजन
यावेळी अलका सपकाळ यांचे चिरंजीव आणि ‘विचार वारसा फाउंडेशन’चे अध्यक्ष विशाल देशमुख यांनीही विकासाच्या आराखड्यावर प्रकाश टाकला. विशाल देशमुख यांनी आपल्या सामाजिक कार्याद्वारे प्रभागात मोठी ओळख निर्माण केली आहे. ते म्हणाले, “आम्ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर परिवर्तनासाठी मैदानात आहोत. विचार वारसा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत आलो आहोत. आता नगरसेवक निधी आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रभागातील तरुणांसाठी अद्ययावत वाचनालय, महिलांसाठी लघुउद्योगाचे प्रशिक्षण केंद्र आणि प्रत्येक वॉर्डात सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे जाळे विणण्याचा आमचा मानस आहे. प्रभाग १९ ‘क’ हा जळगावातील सर्वात सुरक्षित आणि ‘स्मार्ट’ प्रभाग बनवणे हे आमचे स्वप्न आहे.”
प्रचाराला मिळतोय प्रचंड प्रतिसाद
अलका सपकाळ (देशमुख) यांच्या पदयात्रेला मिळणारा महिलांचा पाठिंबा आणि विशाल देशमुख यांच्या पाठीशी असलेली तरुणाई पाहता, महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. “माणुसकी जपणारे आणि कामाचे नेतृत्व” अशी ओळख या माय-लेकांनी निर्माण केली असल्याने मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
“प्रभाग १९ ‘क’ ची जनता सुज्ञ आहे. आम्हाला मिळणारा प्रतिसाद हा परिवर्तनाची नांदी आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आशीर्वाद मागत आहोत.” – अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) व विशाल देशमुख.
प्रमुख आश्वासने
पायाभूत सुविधा : दर्जात्मक रस्ते आणि सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट.
आरोग्य : प्रभागात फिरत्या दवाखान्याची सोय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र.
शिक्षण : आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र.
स्वच्छता : कचरा कुंडीमुक्त प्रभाग आणि नियमित स्वच्छता मोहीम.









