विकासाभिमुख आश्वासनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

जळगाव (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ (ब) मध्ये अपक्ष उमेदवार चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून परिसरात त्यांच्या प्रचाराचा जोरदार धुमधडाका पाहायला मिळत आहे. घराघरांत संपर्क, नागरिकांशी थेट संवाद आणि छोट्या-मोठ्या प्रचार सभांद्वारे त्यांनी प्रचार अधिक प्रभावी केला आहे.

प्रचारादरम्यान चैताली ठाकरे यांनी ज्या पात्र नागरिकांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा गरजू कुटुंबांना हा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या मूलभूत प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ठाम भूमिका मांडली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित या प्रश्नांवर त्यांनी स्पष्टपणे उपाययोजना सुचवल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास वाढला आहे.
नागरिकांच्या अडचणी ऐकून घेताना आणि विकासकामांबाबत ठोस भूमिका मांडल्यामुळे चैताली ठाकरे यांना परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्गामध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. “काम करणारा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा प्रतिनिधी हवा” अशी भावना मतदारांतून व्यक्त होत असून, त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळत आहे.
चैताली ठाकरे यांनी प्रचारात केवळ आश्वासनांवर भर न देता नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. घराघरांत जाऊन त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या थेट संवादामुळे मतदारांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे.









