प्रभाग १९ ‘क’ मध्ये अलका सपकाळ (देशमुख) यांचा नागरिकांच्या भेटीचा झंझावात
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १९ ‘क’ मधील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला शनिवारी नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीने संपूर्ण प्रभागात विजयाचा विश्वास निर्माण केला आहे.

शनिवारी सकाळी रॅलीला सुरुवात झाल्यानंतर ती व्हीआयपी गल्ली, स्वामी समर्थ मंदिर गल्ली, सिद्धिविनायक गणपती मंदिर, मनपा शाळा क्र. ४५ आणि अशोक किराणा परिसर या मुख्य भागातून मार्गक्रमण करत गेली. यावेळी परिसरातील महिलांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून आणि अलका सपकाळ (देशमुख) यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करत आणि पुष्पवर्षाव करत आपला पाठिंबा दर्शवला.
नागरिकांनी पेढे भरवून विजयासाठी शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे रॅलीत एकच जल्लोष पाहायला मिळाला. केवळ घोषणाबाजी न करता, अलका सपकाळ (देशमुख) यांनी प्रत्येक गल्लीत नागरिकांशी थेट संवाद साधला. विशेषतः गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून त्यांनी प्रभागातील नागरी समस्या जाणून घेतल्या. प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले. या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान होणाऱ्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता महाविकास आघाडीने या प्रभागात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.









