एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अखेर अटक करून मोठे यश मिळवले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत चोरीचा छडा लावत आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून हजारो रुपयांचे चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील टी.एम. नगर परिसरातील सर्वे नं. ५११ ते ५१४ येथे असलेल्या नव्या बांधकामाच्या घरात टाईट फिटिंग व नळ फिटिंगचे काम सुरू होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून नळ फिटिंग तसेच लाईट फिटिंगचे साहित्य चोरी करून नेले.
या प्रकरणी घरमालकाने दि. ७ जानेवारी २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक तयार करून तपासाला गती दिली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजय सिंग पाटील, पोलीस हवालदार रमेश चौधरी, तसेच गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, राहुल घेटे आणि किरण पाटील यांचा समावेश होता. पथकाने घटनास्थळाची पाहणी करत जळगाव शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नेत्रम विभागातील पंकज खडसे, कुंदनसिंग बयस व मुबारक देशमुख यांच्या तांत्रिक मदतीने फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी मास्टर कॉलनी, जळगाव येथील सैय्यद उबेद सैय्यद रफीक पटवे (वय १९ वर्षे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा एक साथीदार विधिसंघर्षित बालक असल्याचेही उघड झाले. आरोपीकडून एकूण २८ हजार रुपये किमतीचे नळ फिटिंग व लाईट फिटिंगचे चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार विजय सिंग पाटील व पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली आहे.









