जळगावात संशयित तरुणासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका ३९ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची आणि तिची तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात मुख्य संशयित मनोज निकम याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही मूळची सांगली जिल्ह्यातील असून सध्या नवी मुंबईतील कामोठे भागात राहते. मुख्य संशयित आरोपी मनोज दादाभाऊ निकम याने फेब्रुवारी २०२१ पासून पीडित महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. या काळात त्याने नवी मुंबईतील बेलपूर येथील हॉटेल स्वागतम, पीडितेचे कामोठे येथील घर आणि जळगाव येथील स्वतःच्या घरी पीडितेवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर संशयित आरोपीने पीडितेची मोठी आर्थिक लूटही केली. संशयित आरोपी मनोज निकम, त्याचे वडील दादाभाऊ निकम आणि आई उषा निकम यांनी संगनमत करून पीडितेकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली.
जळगाव आणि सुरत येथे प्रॉपर्टी घेण्यासाठी, सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आणि मनोजच्या बहिणीच्या लग्नाचे कारण पुढे करून पीडितेकडून एकूण १ कोटी २० लाख रुपये उकळले. लग्नास नकार देऊन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने ८ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









