रावेर शहरातील बंडू चौकात घडली घटना
रावेर (प्रतिनिधी):- लग्नातील जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना रावेर शहरातील बंडू चौकात घडली आहे. या हल्ल्यात शेख शाहरुख शेख हसन हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी रावेर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

फिर्यादी फिरोजाबी शेख हसन (वय ५५, रा. इमामवाडा) यांचा मुलगा शेख शाहरुख हा ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बंडू चौक परिसरातील सऊद मेंबर यांच्या घराजवळील रस्त्यावरून जात होता. यावेळी संशयित आरोपींनी त्याला गाठले. संशयित आरोपी शेख हसन शेख अनवर याच्या लग्नात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून चौघांनी संगनमत करून शाहरुखवर हल्ला चढवला.
संशयितांनी लोखंडी पाईपने शाहरुखच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर आणि पायांवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शाहरुखच्या उजव्या हाताचे मधले बोट, डावा पाय आणि डाव्या हाताचे मनगट फॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी फिरोजाबी शेख हसन यांनी ७ जानेवारी रोजी रावेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शेख हसन शेख अनवर, शेख गोलू शेख शकील, अकिल शेख खलील, शेख नजर शेख अजगर असे अटकेतील संशयित आरोपींचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ७ जानेवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास चारही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हमीद रमजान तडवी करत आहेत.









