महाबळ परिसरात मतदारांचा उदंड प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी):- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रभाग १२ ‘अ’ चे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. आज त्यांनी परिसरातील विविध उपनगरांमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला.

तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललितकुमार घोगले यांनी आज महाबळ कॉलनी, मकरंद नगर, सुरेश नगर आणि हनुमान नगर भागात प्रचार फेरी काढली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर तरुणांनी ‘एकच वादा, ललित दादा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची नवी दृष्टी देण्यासाठी आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन घोगले यांनी यावेळी केले.
या प्रचार फेरीमध्ये ललितकुमार घोगले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात सुमित परदेशी, आरतीताई घोगले, तसेच तरुण कार्यकर्ते राहुल सुरवाडे, अंकित मौर्य, सागर केदार, अतुल पवार, प्रसाद महाजन, गणेश जाधव यांच्यासह प्रभागातील असंख्य नागरिक या पदयात्रेत उत्साहाने सहभागी झाले होते. “प्रभाग १२ ‘अ’ चा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटीबद्ध आहे,” असा विश्वास ललितकुमार घोगले यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रचार फेरीमुळे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) आपली पकड मजबूत केल्याचे चित्र दिसून येत आहे.









