दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
जळगाव प्रतिनिधी :

कोणताही खेळ किंवा स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठी नसून लढण्यासाठी असते. अशा क्रीडा स्पर्धांमधून जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. त्यामुळे स्पर्धा फक्त विजयासाठी न खेळता लढण्याची जिद्द कायम ठेवावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

सोमवार दि. ०५ जानेवारी रोजी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडांगणावर दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के, समाजकल्याण अधिकारी सतीश धस, शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी व प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात करनवाल म्हणाल्या की, खेळ हा सांघिक भावना जोपासणारा विषय असून खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये धाडस, आत्मविश्वास व नेतृत्वगुण वाढीस लागतात. त्यामुळे अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा म्हणजे केवळ जिंकणे किंवा हरणे नसून, लढण्याची ताकद निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार असून, पराभूत स्पर्धकांनाही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सोबत आपल्या दालनात चहा घेत उत्साह वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेच्या ५ टक्के सेस निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांना लघुउद्योगासाठी देण्यात येणाऱ्या निधीचे पूर्वसंमती प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.









