जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील घटना
जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर येथील ३४ वर्षीय तरुण चालक सलीम गुलाब तडवी यांचा डिझेल पोटात गेल्यामुळे मृत्यू झाला आहे. १ जानेवारी रोजी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना ही दुर्घटना घडली होती.
१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सलीम तडवी आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत होते. कॅनमधून डिझेल ट्रॅक्टरमध्ये घेण्यासाठी त्यांनी नळीचा वापर केला. नळीने डिझेल तोंडाने ओढत असताना, डिझेलचा दाब वाढल्याने ते थेट त्यांच्या पोटात गेले. डिझेल पोटात गेल्यामुळे त्यांना तातडीने विषबाधा झाली आणि त्यांची प्रकृती खालावली.
सलीम यांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सलग चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, रविवारी ४ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सलीम हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









