पारोळा बायपासवर भीषण अपघात
पारोळा (प्रतिनिधी): पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मळगाव शिवारात बायपास जोडणीच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी १२:३० च्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २१ वर्षीय रूपाली शुभम बोरसे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती शुभम बोरसे हे गंभीर जखमी झाले आहेत.

शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा) हे पत्नी रूपाली शुभम बोरसे (वय २१) हिला घेऊन त्यांच्या ताब्यातील होंडा शाइन दुचाकीने (क्र. एमएच १९ सीके ६२५२) उंदिरखेडे येथून जळगावकडे जात होते. मळगाव शिवारातील जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आणि नवीन चौपदरी महामार्ग क्र. ५३ ला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर ते रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एरंडोलकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (क्र. एचआर ५८ एफ १३१३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील रूपाली बोरसे या खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शुभम बोरसे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या धडकेत दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी पुरुषोत्तम पांडुरंग बोरसे (वय ३५, रा. उंदिरखेडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक वसीम इरफान (राजपूत) (रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात ट्रक चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डॉ. शरद पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.









