जळगाव महापालिकेत महायुतीच्या विजयी उमेदवारांची संख्या झाली ६
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता महायुतीच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे ७ क मधून बिनविरोध निश्चित झाले आहेत. त्यांचे विरोधातील ४ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ही निवड निश्चित झाली आहे.

आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे २ व शिवसेनेचे ४ असे एकूण ६ उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपच्या गायत्री बेंडाळे यांनी १२ ब मधून विजयाचा श्री गणेशा केल्यानंतर गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निश्चित झाले. यानंतर शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी माघारीच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी आपला अर्ज माघारी घेतला.
त्यामुळे शिवसेनेचे रेखा चुडामण पाटील हे बिनविरोध निश्चित झाले आहेत. विजयानंतर रेखा पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. नंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ७ क मध्ये शेवटच्या अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल सुरेश भोळे यांचा विजय निश्चित झाला आहे.
त्यांच्याविरोधात नितीन पुंडलिक देवराज, जितेंद्र सुभाष चव्हाण, नितीन मनोहर पाटील यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर शेवटचे अपक्ष उमेदवार नितीन रामचंद्र नन्नवरे यांनी दुपारी दीड वाजता माघार घेताच बिनविरोध निवडीचे चित्र निश्चित झाले. यानंतर विशाल भोळे यांच्या समर्थकांनी महापालिकेच्या बाहेर जल्लोष साजरा करत महायुतीच्या एकजूटीचा विजय असल्याचे सांगितले.









