हद्दपारी, शस्त्रजप्ती आणि कडेकोट बंदोबस्त; गुन्हेगारांवर पोलिसांचे कडक नियंत्रण
जळगाव (प्रतिनिधी) : आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडावी, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवायांचा वेग वाढवला असून, आतापर्यंत शस्त्र परवानाधारकांकडून २५१ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जळगाव शहरातील १९ प्रभागांमधून ७५ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी १६९ मतदान केंद्रांवर एकूण ५१६ मतदान बूथचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सविस्तर सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे.
निवडणूक कालावधीत शहरात गोंधळ निर्माण करण्याची शक्यता असलेल्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ९८ इसमांना जळगाव शहरातून हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ७८ इसमांचे हद्दपारी प्रस्ताव मंजुरीसाठी अपर पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १४९ अन्वये १५० इसमांना नोटिसा बजावण्याचे प्रस्तावित असून, त्यातील ६१ जणांना आतापर्यंत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन
निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये ०९ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ६० सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १०७० पुरुष आणि १३७ महिला पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. तसेच ०८ दंगा नियंत्रण पथके, ०२ शीघ्र प्रतिसाद दल, ०१ एसआरपीएफ कंपनी आणि ११०० होमगार्ड्सची मदत घेण्यात येणार आहे.
निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस दल सतत सतर्क असून, कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांनी दिली आहे.








