कारभार स्वीकारताच श्रीकांत पाटलांची मोठी कारवाई; एरंडोलच्या तरुणाकडून तलवार जप्त
कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी):- कासोदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारांना आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आडगाव येथे तलवारीने दहशत माजविणाऱ्या एरंडोल येथील एका युवकास शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी संबंधित तरुणाकडून लोखंडी तलवार जप्त केली आहे.

भरवस्तीत दहशत माजविण्याचा प्रकार २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आडगाव गावात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस हवालदार नंदलाल परदेशी, नितीन सूर्यवंशी व योगेश पाटील यांनी तातडीने गावात धाव घेतली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी तिथून पसार होण्यात यशस्वी झाला होता.
सापळा रचून आवळल्या मुसक्या फरार आरोपीचा शोध सुरू असतानाच, २९ डिसेंबर रोजी तो पुन्हा आडगाव परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विशाल सुभाष महाजन (वय २२, रा. नागोबा मढी, एरंडोल) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने आपली तलवार पाहुणे योगेश महाजन यांच्या घरातील लाकडी कॉटखाली लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने छापा टाकून २९ इंच लांबीची तीक्ष्ण तलवार हस्तगत केली.
कायदेशीर कारवाई व पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विशाल महाजन विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, पो.उ.नि. धर्मराज पाटील व त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अकील मुजावर करत आहेत.









