तिकीट कापल्यामुळे पक्षअंतर्गत प्रचंड अस्वस्थता
जळगाव विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल ही आशा अनेकांना लागून होती. मात्र मंगळवारी एकेक उमेदवाराचे नाव समोर येत गेले आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची घोर निराशा होत गेली. शहरात खाजगी हॉटेलमध्ये आ. राजूमामा भोळे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपली अस्वस्थता बोलून दाखवली. यावेळी आमदार भोळेंनाही गहिवरून आले होते.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती व्हावी यासाठी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना सांगितले होते त्यानुसार ओढून ताणून तसेच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून ही महायुती बळजबरी करण्यात आल्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसून येत आहे भारतीय जनता पक्षातर्फे तिकीट वाटपामध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे नाराजी पसरली आहे हॉटेल रॉयल पॅलेस येथे निवडणूक प्रमुख आमदार राजू मामा भोळे यांच्याकडे कैफियत मांडून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

लाखो रुपये आम्ही पक्षाच्या उमेदवारांवर खर्च केलेला आहे.लाखो रुपये आम्ही पक्षाच्या उपक्रमांसाठी लावले. मात्र पक्षाने आम्हाला जेव्हा संधी मिळाली तेव्हा पक्ष आमच्या पाठीशी राहिला नाही. आताच्या आता ही युती तोडा आणि स्वबळावर लढा असे कार्यकर्त्यांनी यावेळी निवडणूक प्रमुखांना सांगितले. आम्ही अनेक वर्षे झाले प्रभागांमध्ये काम करत आहोत. आमचा जनसंपर्क दांडगा आहे. आम्ही पक्षासाठी अनेक वेळा पैसे देखील खर्च केले.
पक्षाच्या उमेदवारांचा लोकसभा, विधानसभा, नगरपालिका येथे आम्ही प्रचार प्रसार केला आणि पक्षाशी कायम निष्ठावंत राहिलो. तरीदेखील आम्हाला पक्षाने तिकीट वाटपामध्ये डावलले, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. महायुती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये खदखद वाढली हे आता स्पष्ट झाले आहे.आम्ही दुसऱ्याचा झेंडा का धरायचा ? असाही सवाल या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विचारला आहे.









