उमेदवारांसह समर्थकांची प्रचंड गर्दी
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी १० वाजेपासून सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून राजकीय पक्षांची धावपळ उडताना दिसत आहे.


तब्बल ७ वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे या निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्यासाठी ७०० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे.जळगाव शहरातील १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सकाळी ८ वाजेपासूनच पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ता बंद केलेला आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारात पहिल्या गेटमधून उमेदवार व त्यांच्यासोबत दोन जणांना सोडण्यात येत आहे तर दुसऱ्या गेटमधून महापालिकेचे कर्मचारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांची तसेच उमेदवारांची धावपळ या ठिकाणी उडताना दिसत आहे.










