शिरसोली (प्रतिनिधी): येथील माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ शिरसोली संचलित बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्षपदी विद्यमान संचालक निलेश दिलीप खलसे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून आणि गावातून त्यांचे कौतुक होत आहे.


मावळते अध्यक्ष अर्जुन बारकु काटोले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निलेश खलसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवनियुक्त अध्यक्ष निलेश खलसे यांनी निवडीनंतर कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि शैक्षणिक भरभराटीसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यालयाचा नावलौकिक वाढवण्याचा माझा मानस आहे.”
या विशेष निवड प्रक्रियेप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी, खजिनदार कमलाकर तांदळे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष अर्जुन काटोले यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निलेश खलसे यांच्या निवडीचे वृत्त समजताच शिरसोली गावात आणि शालेय परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद, तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तरुण आणि उत्साही नेतृत्व मिळाल्यामुळे विद्यालयाच्या कामकाजाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









